— स्वामी विवेकानंद
"We want that education by which character is formed, strength of mind is increased, the intellect is expanded & by which one can stand on one's own feet."
स्वाध्याय महर्षि श्री. पांडुरंगशास्री आठवले तथा दादाजींच्या तत्वज्ञान विद्यापीठ या प्रबोधक संस्थेत व स्वाध्यायी विचारात राहून आम्ही काही युवकांनी जीवन धडे घेतले. माणूस म्हणून जगण्याची आशा प्रबळ बनली, भारतीय संस्कृतिक विचारधारा अभ्यासुन संस्कृतीसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. तत्वज्ञान विद्यापीठातील शिक्षक श्री. निगळजींकडून सांसारिक जीवनाबरोबर विवेकनिष्ठ व स्वाभिमानी जीवनाची शिकवण मिळाली. ते नेहेमी म्हणतात,
'कुटुंब आणि शिक्षण ह्या मानवी जीवनातील पायाभूत संस्था सचोटीने काम करणार्या शिक्षण संस्थेचं काम म्हणजे खरं संस्कृतीचं काम.'
आप-आपल्या शक्तीनुरूप हे काम करण्या हेतू प्रारंभी आम्ही सात जण एकत्र बसू लागलो, समविचारी म्हणून आप-आपला चरितार्थ सांभाळत स्व-विकासार्थ अर्थात आनंदासाठी गप्पा गोष्टी, चर्चा इ. माध्यमातून अभ्यास सुरू झाला. एक-दुसर्याच्या घरी दिवसभरातील कामे आटोपून सतत दोन वर्ष बसलो. जीवन आनंदी बनण्यासाठी लेखन, वाचन, पर्यटन, साइकलस्वारी, सहली असे प्रयोग ही केले. नियमीत बसण्याला (अखंडित) निमित्त हवे म्हणून शालेय मुलांसाठी निस्वार्थ भावनेने अभ्यास वर्ग (शिकवणी वर्ग) सुरू केले. राष्ट्रीय, संस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारा मुलांसोबत आम्ही जीवनाचा आनंद लूटू लागलो. व्यक्तिगत कामे आटोपून कधी कधी बाजूला ठेऊन यज्ञीय कामास नेहेमीच उत्सुक! दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मासिक अभ्यासवर्गासाठी आम्ही सर्व ताई-दादा २४ तास एकत्र राहायचो, विविध अंगी विषयांवर चर्चा, खेळ, गप्पा गोष्टी, धमालच नुसती! आम्हा युवकांच्या ह्या एकत्रित कृतींना निगळजी भाई SELF IMPROVEMENT CLUB म्हणतात. उपक्रमांत सहभागी होणार्या मुलांचे पालक व समविचारी मित्रमंडळी जोडली जाऊ लागली, सामूहिक कृतीचा आनंदच न्यारा! मुलांशी, पालकांशी, व नवनवीन मित्रांशी संबंधांची विण बांधली गेली. युवकांचा हा चमु वाढत गेला. लोकाभिमुख मात्र निस्वार्थतेने काम करणार्या ह्या चमुचे नामाभिदान झाले,
"संस्कार निकेतन"
अनौपचारिक व संबधाधारित उपक्रमांनी काम करणार्यांमधे सकारात्मक उत्साह संचारलाच, शिवाय त्यात सहभाग घेणार्यांचा प्रतिसादही उत्तम मिळू लागला.
यज्ञीय पद्धतीने होणार्या ह्या कार्यक्रमातून एक सामूहिक शक्ति उभी राहिली. ईशभक्तीतून होणारे हे ईश्वरी काम आहे अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची पक्की धारणा आहे. ह्याच धारणेने एक-एक जोडला गेला स्वत:च्या आनंदासाठी आपल्या क्षमतेनुसार जबबदारी ही स्वीकारू लागला व त्यातूनच नियमीत अभ्यासवर्ग, संस्कार संवर्धन उत्सव, साप्ताहीक सत्यार्पण, साहस शिबीर, युवातेजोधीगम्, स्नातक अभ्यासक्रम तसेच, संस्कार निकेतन - एक परिपूर्ण शाळा ही एक नासिकस्थित प्राथमिक शाळा आणि संस्कार निकेतन - एक वैदिक पाठशाळा हे एक खाजगी निवासी गुरुकुल करंजगाव ता. निफाड जि. नासिक असे उपक्रम सुरू झाले. आज या उपक्रमात दर वर्षी ताई-दादा म्हणून जवळ जवळ ५० दांपत्य आणि १००० विद्यार्थी सहभागी होतात. ह्या उपक्रमांसाठीचा खर्च आम्हा युवकांना कधी मोठा विषय वाटला नाही, उपक्रमात सहभागी होणारी मुले उपक्रमासाठी विहित खर्च जमा करतात आणि आम्ही सहभागी युवक आप-आपल्या क्षमतेनुसार ह्या ईश्वरी कार्यासाठी ईश्वराचा भाग म्हणून स्वत:च्या उत्पन्नातील काही रक्कम बाजूला काढतो त्यात जेवढे शक्य तेवढे उपक्रम करतो. आजवर ह्या उपक्रमांसाठी कुणाकडून देणगी मागितली नाही कारण हे काम स्वानंदासाठी करतो त्यामुळे सहभागी होणारा स्वत:च तो भार उचलतो आणि स्वविकासार्थ उचलेले हे काम व्यक्तीनिर्माणातून समाज परिवर्तनाकडे जाते !!
संस्कारात् द्विज् उच्यते